Type Here to Get Search Results !

जय भीम चित्रपट Review - वास्तवाचे दर्शन घडवणारा धाडसी सिनेमा

"इथ गांधी नेहरू सारखे मोठे नेते आहे,आंबेडकर कुठे दिसत नाही"- 'जय भीम' चित्रपटातील एक संवाद
'Jai Bhim' movie 2021 review in marathi

2(caps) नोव्हेंबर रोजी अमेझॉन प्राइमवर प्रदर्शित करण्यात आलेला जय भीम चित्रपट भाषेची काळाची प्रांताची चौकट मोडून देशभरातील प्रेेक्षकांना आवडतांना दिसतोय.90 च्या दशकातील सत्य घटनेवर आधारित 'जयभीम' सिनेमात शोषित वंचितांच्या हक्कासाठी लढणाऱ्या एका आंबेडकर-पेरियार-कार्ल मार्क्स यांच्या विचारांशी बांधिलकी असणाऱ्या वकिलाचा शोषितांच्या, पीडितांच्या अन्यायाविरुद्धचा लढा दाखवण्यात आला आहे.


Jai Bhim movie 2021 poster a women with her daughter and a police,suriya sitting in lawyer desk

चित्रपटाची कथा,1993 मध्ये घडलेल्या तामिळनाडूतील एका छोट्या गावातील आदिवासी समुदायातील काही निर्दोष लोकांवर भ्रष्ट पोलिसांकडून झालेल्या अत्याचाराची सत्य घटना आहे.एका गावात काही आदिवासी कुटुंब इतरांच्या शेतात,विटभट्टीवर कष्ट करून आपला उदरनिर्वाह करत असतात.त्याच तांड्यावर राजा कंन्नू (के.मनिकांदन K.Manikandan) त्याची पत्नी सेंगनी(लिजोमोल जोस Lijomol Josh)त्यांच्या लहान मुलीसोबत राहत असतात.राजा आणि सेंगनी यांना स्वतःचे विटांचे घर सुद्धा नसते पण ते कष्ट करून त्यांच्या मुली व होणाऱ्या बाळासाठी आनंदी असतात.एक दिवस गावातील उच्चजातीय सरपंचाची पत्नी आपले कपाटातील दागिने काढते पण तेवढ्यात तिला तिथे साप दिसतो.साप पकडण्यासाठी राजा कंन्नूला बोलावले जाते. राजा सापाला पकडण्यासाठी त्या खोलीत जातो.त्याने सापाला पकडून नेल्यानंतर काही दिवसांनी त्या सरपंचाच्या घरी चोरी होते.सरपंचाची पत्नी राजा कंन्नू याच्यावर संशय व्यक्त करते.पोलीस तांड्यावरील राजा कंन्नू सह इतरही महिला आणि पुरुषांना पकडून नेतात.व त्यांना अमानुषपणे मारहाण करतात.असाह्य यातना देतात.पोलीस कस्टडीमध्ये दाखवण्यात आलेल्या टॉर्चरचे काही सीन्स सामान्य प्रेक्षकांना अतिरंजित वाटतील पण त्याहून जास्त ही स्वतंत्र भारतातील न्यायव्यवस्थेची शोकांतिका वाटेल.केवळ गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेली 'जात' हीच गुन्हा करू शकते हे प्रमाण मानून चालणारी व्यवस्था 'जय भीम' चित्रपट उजागर करू पाहते.सिनेमा बऱ्याच गोष्टींवर भाष्य करतांना दिसतो.ज्यात भटके,आदिवासी यांना आजही जात प्रमाणपत्र,मतदान कार्ड यासारख्या पायाभूत अधिकारासाठी प्रशासणाच्या हातापाया पडावे लागते.तसेच मतदान यादीत यांचे नाव टाकून मतदानासाठी या खालच्या जातीच्या लोकांच्या झोपड्यात जाऊन पाय पडावे लागेल,हे सांगणारी मानसिकता बघायला मिळते.

एकीकडे अस्पृश्य तसेच निर्दोष आदिवासींच्या मानवी न्याय हक्कासाठी लढणारा आंबेडकरी विचारांनी झपाटलेला चंद्रु (सुरीया Suriya) मद्रास हायकोर्टात ऍडव्हॉकेट दाखवला आहे.तांड्यावर स्वयंसेवी शिक्षिकेचे काम करणारी मैथ्रीया (राजेशी विजायन Rajeshi Vijayan) ही संगणीला चंद्रु पर्यंत घेऊन जाते.चंद्रु सर्व गोष्टी ऐकल्यानंतर हायकोर्टात या केस संबंधी याचिका दाखल करतो.दरम्यान चित्रपट बरेच वळण घेतांना दिसतो.ज्यामध्ये पोलीस राजा कंन्नूला फरार घोषित करतात पण सत्य काही वेगळेच असते.पुढे इन्स्पेक्टर जनरल कडून करण्यात आलेल्या तपासाअंती बऱ्याच गोष्टी समोर येतात.शेवटी कोर्टातील वास्तववादी वादविवादानंतर सत्याचा विजय कशाप्रकारे होतो हे खूप सुंदररित्या दाखवले जाते.


Actor Suriya in lawyer getup for jai bhim movie

सिनेमात कुठेही अतिशयोक्ती न दाखवता सत्य घटनेवरील कथेला पूर्ण न्याय दिल्या गेला आहे.सिनेमाचा निर्माता अभिनेता सुरीया याने बळजबरीने त्याचा ऑन स्क्रीन टाइम वाढविण्याचा कुठेही प्रयत्न केलेला दिसत नाही.चित्रपटात सर्वच कलाकारांनी आपला नैसर्गिक अभिनयाने पात्रांना जिवंत केले आहे.विशेषतः सुरीया, लिजोमोल जोस, के.मनिकांदन आणि कर्तव्यदक्ष पोलीस आय.जी च्या भूमिकेत असलेले वरिष्ठ अभिनेता प्रकाश राज (Prakash Raj) या सर्वांचा प्रांजळ अभिनय प्रेक्षकांना चित्रपटात गुंतवून ठेवतो.

'जय भीम' सिनेमातील चंद्रु हे पात्र तामिळनाडूतील मानवी हक्कांसाठी लढणारे प्रसिद्ध जस्टीस के.चंद्रु यांच्यावर आधारलेले आहे.ते वकिली करत असलेल्या काळातली ही घटना चित्रपटात दाखवली आहे.चंद्रु पुढे हायकोर्टात जज झाले होते.त्यांच्या कार्यकाळात त्यांनी सर्वात जलद गतीने पेंडिंग पडलेल्या केसेसचा निकाल देण्याचा विक्रम केला आहे.त्यांनी जस्टीस म्हणून काम पाहतांना 96000 खटले निकालात काढले होते.चंद्रु वकील असतांना मानवी हक्कांच्या खटल्यात फीस म्हणून एक पैसाही घेत नव्हते.सिनेमाच्या शेवटी चंद्रु यांची ओळख करून देणारे फोटो टाकण्यात आले आहे.ज्यात त्यांच्याविषयी माहिती मिळते.चंद्रु यांच्यामते 'आंबेडकर रायटिंग अँड स्पीचेस' या ग्रंथाचे त्यांनी हाताळलेल्या खटल्यात त्यांना खूप मदत झाली आहे.

एकंदरीतच 'जय भीम' चित्रपट वास्तवाचे अभूतपूर्व दर्शन घडवणारा एक धाडसी सिनेमा आहे.या निमित्ताने तमिळ सिने इंडस्ट्रीचे जेवढे कौतुक करता येईल तेवढे कमी आहे.अशा संवेदनशील वास्तववादी विषयावर चित्रपट बनवण्यासाठी बॉलीवूड आणि मराठी चित्रपट इंडस्ट्रीत हिम्मत का होत नाही?याचे नवल वाटते.

Tags

Post a Comment

1 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.
  1. Best analysis,I like your movie review specially this one. Keep writing

    ReplyDelete